दहशतवादी हल्ल्याचा बीसीसीआयकडून निषेध   

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे काल (२२ एप्रिल ) दुपारच्या वेळी पर्यटकांवर भ्याड हल्ला करण्यात आला होता. या घटनेत २६ जणांनी जीव गमावला. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे.तर, २  विदेशी पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. जम्मू कास्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभर संतापाचे वातावरण आहे. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाची या दहशतवादी संघटनेशी संबंधित ’द रेजिस्टंस फ्रंट’नं घेतली आहे. भारतीय क्रिकेटपटूंनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. या दरम्यान बीसीसीआयनं देखील पाकिस्तान संदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे.  
 
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या घटनेसंदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही पीडितांसोबत असून या घटनेचा निषेध करतो, असं ते म्हणाले. बीसीसीआयनं पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं बंद करावं का असा प्रश्न राजीव शुक्ला यांना विचारण्यात आला. यावर शुक्ला यांनी आमचं सरकार जे सांगेल ते आम्ही करु, अशी भूमिका घेतली. सरकारच्या भूमिकेमुळं पाकिस्तान विरुद्द द्वीपक्षीय मालिका खेळत नाही. यापुढं देखील द्वीपक्षीय मालिका पाकिस्तान विरुद्ध खेळणार नाही, असं राजीव शुक्ला यांनी म्हटलं. आयसीसी स्पर्धांसंदर्भात विचार केल्यास आयसीसीच्या नियमांमुळं खेळतो, असं शुक्ला म्हणाले.  
 
भारत आणि पाकिस्तान यांच्यात यापूर्वी द्वीपक्षीय मालिका २०१२-१३ मध्ये झाली होती. ही मालिका एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची होती. पाकिस्ताननं त्यावेळी भारताचा दौरा केला होता. त्यावेळी २ टी २० क्रिकेट सामे देखील झाले होते. दुसरीकडे भारतानं २००७ मध्ये पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळली होती. पाकिस्तानचा संघ २०२३ मध्ये वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात आला होता.  आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे होतं. 
 
भारतानं पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दिल्यानंतर आयसीसीनं भारताचे सामने दुबईत आयोजित केले होते.  दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून जण जखमी आहेत. महाराष्ट्रातील ६ जणांचा यामध्ये मृत्यू झाला.  हा हल्ला काल दुपारी अडीच वाजता झाला. ज्यावेळी पर्यटक घोड्यावरुन एका पार्कमध्ये पर्यटनाचा आनंद घेत होते. यावेळी दहशतवाद्यांनी नाव विचारुन हल्लाबोल केला.  
 

Related Articles